रिव्हर्स घेताना हायवाने दुचाकीस्वार तरुणीला चिरडले

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : हायवाचालकाने रिव्हर्स घेताना मागे न पाहताच दुचाकीस्वार १८ वर्षीय तरुणीला चिरडल्याची घटना चिकलठाण्याजवळील हिरापूर शिवारात मंगळवारी (दि.१७) घडली. उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात बुधवारी (दि.१८) सकाळी तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी महापारेषणसह हायवाचालकावर कारवाईसाठी तीन तास चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.
मनस्वी विजय गाडगे (वय १८, रा. कॉपर व्हाइट सोसायटी, पीएसबीए शाळेजवळ, हिरापूर शिवार, छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिचे वडील खासगी हॉटेलमध्ये व्यवस्थापक असून, ते चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन मंगळवारी सकाळी मनस्वी दुचाकीने आई व बहिणीसह रुग्णालयाकडे निघाली होती. दरम्यान, आईला चक्कर आल्याने दुचाकी तिने रस्त्याच्या बाजूला घेत थांबवली. तेथेच महापारेषणच्या हायहोल्टेज तारा टाकण्यासाठी खांब उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खड्डे खोदलेले असून, मुरुम टाकण्यासाठी थांबलेल्या हायवाचालकाने मागचा अंदाज न घेता हायवा वेगात मागे घेत थेट मनस्वीच्या अंगावर घातला. यात तिची आई बाजूला फेकली गेली तर मनस्वीचा कंबरेखालच्या भागाला गंभीर दुखापत झाली. मनस्वीला प्रथम चिश्तिया चौकातील खासगी रुग्णालयात नेले. तेथे उपचार होत नसल्याने तातडीने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारांना उशीर झाल्याने मनस्वीची प्रकृती अधिकच बिघडली. बुधवारी सकाळी तिचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. 
अभ्यासात होती हुशार...
मनस्वी बारावीची परीक्षा देऊन सीईटीची तयारी करत होती. ती अभ्यासात हुशार होती. तिला एक लहान बहीण आहे. मनस्वीच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाइकांसह नागरिकांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. ३ तास आंदोलन केल्यानंतर सायंकाळी हायवाचालक, महापारेषण व महापारेषणच्या कंत्राटदाराविरुद्ध मनस्वीच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस अंमलदार सुनील सुरासे करत आहेत.